भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रिपदं? एकनाथ शिंदे म्हणाले…

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आता भाजप आणि शिवसेना शिंदेगटाचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कसं असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे, असं शिंदे यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.