अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीआधी ‘धनुष्यबाण’ गोठलं, निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपच्या पथ्यावर?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना सतत चेकमेट देण्याचा प्रयत्न शिंदेगटाकडून करण्यात येतोच आहे. त्यात आज निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय जरी अंतरिम असला तरी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. शिवसेनेचं धनुष्य बाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने तसंच शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यापैकी कुठल्याही गटाला वापरण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे. खरी शिवसेना कुठली, याचा फैसला घेता न आल्यामुळे निवडणूक आयोगाने हा अंतरिम निर्णय घेतल्याची माहिती दिलेली आहे. आता अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. कारण आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर थोड्या काळासाठी का होईना पण मोठा पेच निर्माण झालेला आहे.लढाई आता खऱ्या अर्थाने सुरु झालीये. आता नवे चिन्ह, नवा प्रचार आणि नवी रणनिती आखून येणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेला उतरावे लागेल. निवडणूक आयोगानं नव्या चिन्हाबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत घेण्याचे आदेशही दिलेले आहेत. तेव्हा जेमतेम 2 दिवसात नवे चिन्ह निवडून पुढील निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. मात्र हा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे.
या भागात ख्रिश्चन, मुस्लीम, दलित, उत्तर भारतीय आणि मराठी अशी मिश्र लोकवस्ती आहे. यापैकी ख्रिश्चन समूदाय हा पूर्वापार काँग्रेसला मतदान करत आलाय पण या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नसल्यास ख्रिश्चन नागरिक मतदानासाठी कितपत बाहेर पडतील, याबाबत शंका आहे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गटाकडून या निवडणुकीत जोरदार ताकद लावणार यात शंकाट नाही, तरी ही जागा भाजप लढवणार आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच रणनीती ठरविली जाणार असल्याचं समजते आहे. भाजपचे निवडणूक चिन्ह हे कमळ आहे आणि भाजपसोबत युती केल्यामुळे त्यांचा प्रचार करायची वेळ शिंदे गटावर येणार आहे. तेव्हा या दोघांच्या भांडणात भाजपचा लाभ होईल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.