दिवाळीनंतर महापालिका निवडणुकांचा बार?

राज्यात महानगरपालिकांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती दर्शनाच्या निमित्तानं वेगवेगळे नेते आणि त्यांच्याशी संबंधित मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावलाय.गणेश दर्शनाच्या निमित्तानं शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. नव्या राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरु असताना महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती मिळतेय.
शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची झालीय.त्यामुळे निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात डोळ्यांसमोर ठेवून शिंदे फडणवीस सरकारची तयारी सुरू आहे. गणपती उत्सवाची धामधूम संपल्यानंतर मंत्री आपापल्या जिल्ह्यात दौरा करून जनतेचा कल घेणार आहेत.
निवडणुकांच्या आधी शिंदे गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी निवडणूक आयोग आणि न्यायालयात जोरदार प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई महापालिकेची तयारी म्हणून अमित शाहांचा झालेला मुंबईचा दौरा आणि राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर ठाणे नवी मुंबई महापालिकेसाठी काल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच मनोमिलन ही निवडणुकांचीच तयारी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे