ठाकरेंकडून एकनाथ शिंदे शिवसेना हिसकावणार?

राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी सुरूच आहेत. शिवसेनेत आजवरझालेल्या सर्वात मोठ्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे गट आक्रमकपणे रणनीती आखत आहे. लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळावी ही मागणी केली गेली आहे.
शिवसेनेचे आमदार फोडूनही शिवसेनेतच आहोत, असा दावा शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी केला आहे. भाजप व शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर अनेक पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी हे शिंदे गटाच्या बाजूस येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करत स्वत: ची नवीन कार्यकारणी घोषित केली. त्यानंतर आता शिवसेनेवर आपलाच अधिकार असल्याचं शिंदे गट सांगेल, अशी चर्चा होती. आता या चर्चेत आता तथ्य असल्याचं दिसून येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार, शिंदे गटातील खासदारांकडे लोकसभेचे गटनेतेपद गेल्यानंतर या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला रात्री उशिरा एक पत्र दिले. या पत्रात बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असून त्यांना मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.रात्री उशिरा राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मध्यरात्री पत्र निवडणूक आयोगाकडे सुपूर्त केले गेले. आता शिवसेनेवरच अधिकार सांगितल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.