ठाकरे-शिंदे गटामुळे घरातसुद्धा झाले दोन गट ! 

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर आपल्याला शिवसेनेचे दोन गट पहायला मिळतात. एक आहे शिंदे गट तर दुसरा आहे ठाकरे गट. दोन्ही गट दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करताना दिसत आहेत. राजकारणात जेव्हा एक गट फुटतो त्यावेळी ती फूट आमदार, खासदार अगदी कार्यकर्त्यांमध्येही दिसून येते. आता ही फुट घरातसुद्धा गेलेली आहे. बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या घरातही दोन गट पडलेले दिसत आहेत. आमदार किशोर पाटील शिंदेगटात सहभागी झालेले असताना त्यांची चुलत बहिण वैशाली सुर्यवंशी यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनिष्ठ राहण्याचे ठरविले आहे.
किशोर पाटील हे पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. दिवंगत उद्योगपती आणि शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांचे पुतणे असून त्यांचा राजकीय वारसा किशोर पाटील यांनी पुढे घेवून गेले. २५ वर्षे किशोर पाटील ठाकरेंबरोबर एकनिष्ठ होते. काकांनी जपलेला वारसा, राजकीय हितसंबंध याला त्यांनी कधीच तडा जावू दिला नाही मात्र अचानक किशोर पाटील यांनी शिंदेगटाला साथ दिली. याविरोधातच आता आर.ओ. पाटलांची कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी भावाविरुद्ध बंड केलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला वैशाली सुर्यवंशी यांनी पाचोरामध्ये जोरदार बॅनरबाजी केली. एकाच कुटुंबातील असलेल्या वैशाली यांनी भाऊ आमदार किशोर पाटील यांना पाठिंबा न दर्शविता उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत वेगळी वाट निवडल्यामुळे जळगावच्या राजकारणात आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाबरोबर असलेले संबध त्याला तडा जावू नये तसेत भविष्यकाळात मातोश्रीवरून जे निर्णय येतील त्याला आपण पूर्णपणे साथ देवू असे मत वैशाली सुर्यवंशी व्यक्त केलंय. त्यामुळे भविष्यकाळात पाचोऱ्यात भाऊ आमदार किशोर पाटील आणि बहिण वैशाली सुर्यवंशी यांचा सामना रंगला तर आर्श्चय वाटायला नको.