राज्यपालांचे ते वक्तव्य, काय म्हणाला शिंदे गट?

“मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही,” असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरुन आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाटचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारकडे या संदर्भात तक्रार करणार आहेत अशी माहिती केसरकरांनी दिली आहे.
‘राज्यपालांनी असे वक्तव्य करणे म्हणजे राज्याचा अपमान आहे. मुंबईच्या उभारणीमध्ये सर्व समजाचे योगदान आहे मात्र मराठी माणसाचा वाटा सर्वात मोठा आहे. मुंबईबद्दल असे वक्तव्य करणे म्हणजे राज्यपालांना मुंबईबद्दल माहिती नाही असे दिसून येते असा टोलाही केसरकरांनी लगावला आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नाही. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून असे वक्तव्य पुढे होणार नाही अशी सुचना केंद्राने द्यावी’ अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली आहे. मुंबईमधील औद्योगिक उभारणीत पारशी समाजाचं मोठ योगदान आहे असेही केसरकर म्हणालेत.
विरोधकांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.