ठाकरेंचा माजी मंत्री शिंदे गटात, मग काँग्रेसला मोठा धक्का कशामुळे?

माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिंदेगटात प्रवेश केला आहे. औरंगाबाद येथील सिल्लोडच्या कार्यक्रमात नवले यांनी शिंदे गटाला साथ देत आहोत असे जाहीर केले. ठाकरे कुटुंबाबरोबर नवले एकनिष्ठ होते मनोहज जोशी मुख्यमंत्री असताना नवले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. दरम्यान नवले शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकापाठो एक करत शिंदेगटाची वाट धरत आहेत.
१९९० आणि १९९५ काळात बीड विधानसभेसाठी शिवसेनेकडून राज्यातील सर्वात पहिला उमेदवार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश नवले यांचे नाव जाहीर केले होते. सुरेश नवले हे ठाकरे कुटुंबियांच्या खूप जवळ मानले जात. दरम्यान नवले यांनी शिंदेगटात प्रवेश केल्यामुळे फक्त ठाकरेंनाच धक्का बसेलाल नाही तर काँग्रेससाठी ही धक्कादायक बाब आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर २००५ मध्ये नवले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेवर संधी देत राज्यात ऊर्जामंत्रिपद दिले होते. त्यानंतर नवले राजकारणापासून दूर होते त्यांनी नवले मित्रमंडळ स्थापन करून त्याद्वारे ते कामकाज करत होते.
आता मात्र त्यांनी शिंदेगटाला साथ दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सभेत अर्जुन खोतकर यांच्यासह सुरेश नवले यांनी शिंदेगटाला आपला पाठिंबा जाहीर केला. गेल्या सहा महिन्यात नवले मित्र मंडळामार्फत काम सुरु होते. त्यावेळी खोतकर, सत्तार आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यानंतर बीडच्या राजकारणात बदल दिसू लागले होते. एकनाथ शिंदेंसोबत गेल्यास आपल्या राजकीय पुनरागमनासाठी फायदा होईल, या उद्देशाने नवले शिंदे गटात सहभागी झाल्याची चर्चा आहे. मात्र नवले यांनी शिंदे गटाचा हात धरल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या दोघांसाठी हा मोठा धक्का आहे असे बोलले जाते आहे.