सावे-सत्तार मागे, भुमरे सबसे आगे !!

शिंदे गटाचे मंत्री आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पैठण मतदारसंघात पहिल्यांदाच कार्यक्रमासाठी गेले. तेव्हा अनेक खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचा व्हिडिओ समोर आला. अनेकांनी भुमरेंकडे पाठ फिरवल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र भुमरेंना आता औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये तिघा जणांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागली आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या शिंदे गटातून संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार, तर भाजपकडून अतुल सावे अशा तिघाही जणांची नावं चर्चेत होती. मात्र दोघांना मागे सारत आता भुमरेंनी नंबर लावल्याची माहिती आहे. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली असून आता जर भुमरेंना पालकमंत्रीपद मिळालं तर आमदार संजय शिरसाट अधिकच नाराज होण्याची शक्यता आहे.
संदिपान भुमरे यांना औरंगाबाद, तर अतुल सावे यांना जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे. महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सरकारने जिल्ह्याला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच जिल्ह्यातून तीन कॅबिनेट मंत्री, तसंच औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करुन शिंदे सरकारने जनाधार मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. भुमरेंनी नुकतचं शिवसेनेचे ठाकरे गटातील आणखी दोन आमदार फुटणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती. भुमरेंच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि असल्यास ते आमदार कोण असतील, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे