रोहित पवारांचं राम शिंदेंना ओपन चॅलेंज !

आमदार रोहित पवार पुण्यात विसर्जनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना थेट आव्हान दिलंय. राम शिंदे यांनी आजच राजीनामा द्यावा, मी सुद्धा उद्या राजीनामा देतो, प्रचाराला देखील जात नाही आणि जनतेच्या प्रेमावर निवडून येतो, असं थेट आव्हान रोहित पवारांनी राम शिंदेंना दिलंय.
दरम्यान, भाजपने विधान परिषदेवर राम शिंदे यांना पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले खरे, पण आता भाजपसमोर आणखी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीला कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी दिली जाईल, याची उत्सुकता आहे. या मतदारसंघात भाजपकडे आता असा प्रबळ उमेदवारच दिसत नाही. त्यामुळे भाजपला पवारांच्या विरोधात बाहेरच्या जिल्ह्यातून उमेदवार आणावा लागणार अशी चर्चा सुरु आहे.
राम शिंदे यांनी या मतदारसंघात आपला चांगलाच जम बसविला होता. मात्र, मागील वेळी रोहित पवार यांच्या या मतदारसंघात एंट्री झाली आणि शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राम शिंदेंची ही टर्म सहा वर्षांची असणार. त्यामुळे दोन वर्षांनी येणारी विधानसभा निवडणूक ते लढविण्याची शक्यता कमीच आहे. असे झाले तर मग या मतदारसंघात पवारांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण असेल? याची आता चर्चा सुरू झालीय. दरम्यान रोहित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला अद्याप राम शिंदेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.