पुढच्या आठवड्यात कशी असेल पावसाची स्थिती?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही धरणं भरली आहे. तर काही धरण क्षेत्रांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अशातच येणाऱ्या काळात पाऊस हा आता हळूहळू ओसरणार आहे. येत्या सोमवारपर्यंत पावसाचा जोर हा कमी कमी होत जाणार आहे आणि मंगळवार, बुधवारनंतर पाऊस उघडीप घेईल, अशी माहिती हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. तर, राज्यातील बऱ्याच भागात पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळाली. मुंबईतही आज सकाळपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे.
“पावसाचा आढावा घेतला तर राज्यात आणखी पावसाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणं अद्याप भरायची आहे. यापुढेही पाऊस चांगला असेल. मात्र, मध्यंतरीच्या काळात पावसाची उघडीप असेल. त्यानंतर पुन्हा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. राज्यात १५ जुलैपर्यंत सरसरीपेक्षा ३० टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे जुलै अखेर, ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व धरणं भरतील. यावर्षी पाण्याची चिंता राहणार नाही”, अशीही माहिती डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.
मुंबईत पावसाचा जोर ओसरला
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आहे.