शरद पवारांसाठी ‘हा’ दुसरा धक्का !

महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती संघटनेचा हा निर्णय शरद पवारांसाठी धक्का आहे. कारण ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धा आयोजित करणे आणि अन्य निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील.
बरखास्तीमागची कारणं काय?
भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, हे सुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यामागचं एक कारण आहे. त्याशिवाय राज्यातील मल्लांकडूनही राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी आल्या होत्या. 15 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तयार झाली नाही. ही बरखास्ती मागची काही कारणं आहेत.
कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा मोठा नाव लौकीक
भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पण महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेकडून अपेक्षित हालचाल न झाल्यामुळे अखेर हा निर्णय घेतला. देशात कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा नावलौकीक आहे. महाराष्ट्राच्या मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.