वेदांताने मुख्यमंत्री शिंदेंना लिहीलेलं पत्र ‘बातम्यां’च्या हाती!

वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्याचं वातावरण तापलंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या गदारोळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वेदांता यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार समोर आलाय. या पत्रातून काही खुलासे झालेत. वेदांता समुहाने पुण्याजवळच्या तळेगावमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याआधी महाराष्ट्र सरकारकडे दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांचा उल्लेख या पत्रात आहे.
जुलै महिन्यात वेदांताने मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहीलं होतं. त्यात वेदांताकडून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील पहिली मागणी होती केंद्र सरकारशी समन्वय आणि दुसरी मागणी होती राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ! मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्राला उत्तर देताना दोन्ही मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक दिशेने विचार करतंय असं आश्वासन अग्रवाल यांना दिलं होतं. याविषयी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली जाईल आणि त्या आधारे राज्य मंत्रिमंडळाची मंजुरीही घेतली जाईल असं ही म्हटलं होतं. २९ जुलै १२ वाजता सामंज्यस्य करार करु असंही शिंदे यांनी पत्रात म्हटलं होतं. मात्र तरीही वेदांताकडून गुजरातला पसंती देण्यात आली.
या पत्रामध्ये ज्या दोन मुद्द्यांचा उल्लेख केला आहे, त्याविषयी वेदांताला विचारणा केली असता वेदांता समूहाने कोणतंही भाष्य करण्यास नकार दिलाय. एकूणच या पत्रामुळे राज्य सरकारवर केंद्राचा दबाव आहे अशी चर्चा सुरु झालीय.