महाविकास आघाडीला पुन्हा धक्का, मुंबै बँकेत सत्तांतर होणार !

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आता अजून एक धक्का महाविकास आघाडीला बसणार आहे. मुंबै बँकेत सत्तांतर होणार असून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा पुन्हा एकदा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी होणाऱ्या मुंबै बँकेतील बैठकित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकिचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबै बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी अध्यक्षपदाचा तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच मुंबै बँकेच्या अध्यक्षपदावर दरेकरांचे पुनरागमन होणार आहे.महाविकास आघाडीने मुंबै बँकेवर असणारी दरेकरांची सत्ता खेचून घेतली होती. युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वतः निवडणुकिची सुत्र हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता.
गेल्या निवडणुकीत दरेकरांवर मजूर प्रवर्गातून निवडून आल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्यक्ष मजूर नसून बनावट कागदपत्राच्या आधारे मजूर असल्याचे दाखवत १९९९ पासून २०२१ पर्यंत दरेकर संचालक मंडळावर होते. मजूर नसताना निवडून येणे, सरकार आणि जनतेची फसवणूक करणे असा आरोप करत आपच्या धनंजय शिंदे यांनी दरेकरांविरोधात तक्रार नोंदवली होती.