एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातच पडणार खिंडार?

राज्यात सध्या सरकारच्या अस्थिरतेबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात आता एकनात शिंदेंच्या जिल्ह्यातच शिंदे गटातील दोन आमदारांमधील धुसफूस समोर आलेली आहे. आमदार महेश शिंदे यांनी बोलता बोलता ही खदखद व्यक्त केलीय. त्यामुळे साताऱ्यातून शिंदेंला खिंडार पडू शकते अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर नाराज असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून साताऱ्यात सुरुये. याचं कारण सांगितलं जातंय महेश शिंदे यांना पालकमंत्री शंभुराज देसाई हवी तेवढी ताकद देत नसल्याचं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातच शिंदे गटात नाराजीचा स्फोट होऊन गटाला गळती लागू शकते, अशा शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे या दोघांनी जिल्ह्यात शिंदे गटाला ताकद देत गट वाढवण्यास मोठा हातभार लावला आहे. मात्र, अलिकडच्या काही दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान शंभूराज देसाई यांच्यावर कोणतीही नाराजी नाही असं आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केलंय पण त्याचबरोबर अपेक्षा तर प्रत्येकालाच असते. ज्याचं नशीब असतं, त्यालाच मिळतं. मी माझं काम करत राहतोय, याचा रिझल्ट मला शंभर टक्के मिळणार याची खात्री आहे असंही म्हटल आहे.