नव्या नवरीची पहिली संक्रांत? वाण देतांना निवडा ‘या’ गोष्टी

मकर संक्रात महिला वर्गाचा सर्वात जास्त आवडता सण कारण या सणात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो. खास काळी नेसून सौभाग्याचं वाण लुटलं जातं. एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू दान द्याव्यात असे म्हटले जाते. आता वाण काय द्यावं हा प्रश्न नेहमीचाच असतो. आता नवी नवरी असेल तर खालील गोष्टी वाण म्हणून देता येतील .
आरसा – पर्समध्ये ठेवू शकू असा छोटा आरसा वाण म्हणून देवू शकता. ही महिलांची आवडती वस्तू आहे. साजश्रृंगारातील महत्त्वाची वस्तू म्हणून आरसा ओळखला जातो तेव्हा आरसा वाण म्हणून उत्तम आहे.
बांगड्या – कोणत्याही शुभ कार्यात बांगड्या घातल्या जातात. हा सुद्धा एक सौभाग्याचा अलंकार आहे. विविहात तर बांगड्या भरण्याचा खास कार्यक्रम असतो. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात.आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो. म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकतात.
कुंकू किंवा सिंदूर– लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्यालंकार आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो असे म्हणतात. सुवासिनींना वाण म्हणून कुंकवाची डबी किंवा सिंदूर भेट देणे शुभ सर्वोत्तम आहे.
तुळशीचं रोप – अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो. तुळशी विवाहानंतरच लग्नकार्याला सुरवात होते. घर छोटं असो वा मोठं तुळशीचं रोप घराची शोभा द्विगुणीत करतं, संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावला तर घरात सकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे घरात सुख-शांतीचा वास राहतो शिवाय तुळस औषधीसुद्धा आहे. तेव्हा वाण म्हणून तुळशीचं रोप देवू शकता.