मातोश्रीवर ठरलं सॉलिड प्लानिंग; उद्धव ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार !

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यातील संघर्ष अगदी टोकाला गेलाय. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून शिंदे गटाविरोधात दीर्घकाळ कायदेशीर लढाई देण्याचे ठरवले आहे त्यासाठी मातोश्रीवर एक प्लॅन बनवला जातोय. भाजपच्या हुकूमशाही राजकारणाचा ‘बळी’ म्हणून आता उद्धव ठाकरे यांना जनतेसमोर मांडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षातील एक प्रमुख नेता म्हणून उद्धव ठाकरे यांना मांडण्याचा प्रयत्न असेल, असे ठाकरे गटातील सेना नेत्याने सांगितले आहे.

देशातील विरोधकांचा रांगेत म्हणजे शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आणि अखिलेश यादव या नेत्यांच्या रांगेत उद्धव ठाकरे यांना बसवण्याचा ठाकरे गटाचा प्लॅन आहे असे एका नेत्याने सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेची खूप मोठी सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळेल तसेच मराठी माणसाकडून एक कडवं आव्हान केंद्रातील सत्तेला मिळेल. दरम्यान निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह गोठवण्याचा हा आदेश दिलाय.यामुळे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा धनुष्यबाण चिन्हासाठी दावा करण्यात येणार आहे अशी माहिती देखील हाती आलेली आहे.

आता उभारी घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना दोन मुद्द्यांवर वेगाने हालचाली करणं गरजेचं आहे. एक म्हणजे कायदेशीर लढाईसोबतच उद्धव ठाकरे यांना लवकरात लवकर मोठी राजकीय खेळी करावी लागणार आहे. तसेच पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरून नव्याने भव्य उभारणी करावी लागेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट आहे. ही जागा कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. सेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरेगटाकडून उमेदवारी दिलेली आहे. शिंदे गट या निवडणुकीपासून दूर असून भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिलीय. पण ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी नाही. कारण या मतदारसंघात मराठी ‘टक्का’ घसरलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.