MCA निवडणुकित पवार- फडणवीस रंगणार वॉर!

मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे कारण २८ सप्टेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनचं नवीन पॅनल निवडण्यासाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. दिग्गज राजकारण्यांनी ही निवडूक अगदी प्रतिष्ठेची करुन ठेवली आहे. मनोहर जोशी, विलासराव देशमुख, शरद पवार, आशिष शेलार यांनी एमसीएचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. अनेक दिग्गजांना विशेष करुन राजकारणी मंडळींचा यावर डोळा असतो असे म्हटले जाते.
२८ सप्टेंबरला होणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक खास आहे त्याला अजून एक कारण आहे ते म्हणजे शरद पवारांसोबतच, देवेंद्र फडणवीस, ठाकरे या दिग्गज राजकारण्यांनी उडी मारली आहे. मात्र हे सगळे राजकारणी पडद्यामागून सूत्रं हलवणार आहेत. कारण लोढा कमिटीच्या शिफारशीमुळे राजकारणी मंडळींना थेट निवडणुकीत उतरता येणार नसलं तरी आपली माणसं निवडणुकीत उतरवून एमसीएची खुर्ची आपल्याकडेच ठेवण्यासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्या पवार गट,शेलार गट आणि जुना जाणता महादळकर गट यांच्यातच खरी चुरस आहे. भारताचे माजी खेळाडू संदीप पाटील हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. मागच्या वेळी त्यांना ही निवडणूक लढवता आली नव्हती मात्र यावेळी संदीप पाटील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यांना जुन्या जाणत्या महादळकर गटाचा पाठिंबा मिळाला आहे.
या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील पडद्यामागून उडी घेतल्याचं चित्र आहे. गणेशोत्सवात संदीप पाटील वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्याचा निवडणुकीत पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. दुसरीकडे शेलार गटाकडून एमसीएचे सध्याचे उपाध्यक्ष अमोल काळे यांना मैदानात उतरवण्याच्या प्रयत्नात आहेत. अमोल काळे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे अमोल काळेंना निवडणुकीत जिंकवण्यासाठी पडद्यामागून फडणवीस आणि समोरून आशिष शेलार कसोशीचे प्रयत्न करत आहेत.
तिसरा गट शरद पवारांचा मात्र या निवडणुकीबाबत आपला अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याविषयी पवारांनी अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत. दरम्यान उद्धव ठाकरेंचे विश्वासू जवळचे मिलिंद नार्वेकरही मुंबई क्रिकेट असोसिएनशच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. मात्र राजकारणात भल्या भल्यांना धक्का देणारे शरद पवार आणि महाविकास आघाडीला सत्तेतून खेचून एकनाथ शिंदेंचं सरकार राज्यात आणणारे देवेंद्र फडणवीस यांच्यातच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत खरी चुरस असणार आहे.