महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत होत आहे आणि यातीलच एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बुलढाण्यातील मेहकर मतदार संघ जो गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर दोन्ही शिवसेनेचेच आहेत. पण यंदा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना(सिद्धार्थ खरात) असा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळे मेहकर मतदार संघात कोणती शिवसेना बाजी मारणार तेच जाणून घेऊयात
मेहकर मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मागील तीन टर्म आमदार संजय रायमुलकर हे निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरले असून त्यांच्याविरुद्ध काहीच महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले सिद्धार्थ खरात यांचं आव्हान असेल तर वंचित कडून ऋतुजा चव्हाण यादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र मुख्य लढत ही विद्यमान आमदार संजय रायमुलकर विरुद्ध ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांच्यात होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काहीच महिन्यांपूर्वी शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेत सिद्धार्थ खरात यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला, तेव्हापासूनच सिद्धार्थ खरात हे मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. आणि त्याचप्रमाणे तिकीट वाटपावेळी सिद्धार्थ खरात यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाले. मात्र यामुळे शिवसेना फुटीच्या काळात उद्धव ठाकरेंना साथ दिलेले गोपाल बच्छीरे मात्र नाराज झाले. याच नाराजीतून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला जो त्यांनी नंतर मागे घेतला. पण निष्ठावंतांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याने येथील स्थानिक लोकांमध्ये व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळाला. याशिवाय सिद्धार्थ खरात हे मूळचे या मतदारसंघातील नाहीत सोबतच या मतदारसंघातून उभ्या असलेल्या वंचितच्या उमेदवार ऋतुजा चव्हाण यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. तर या मतदारसंघातलं नसणं, स्थानिक निष्ठावंतांची नाराजी, आणि वंचित कडून उभ्या असलेल्या ऋतुजा चव्हाण या सर्व गोष्टींचा सिद्धांत खरात यांना याचा फटका बसू शकतो.
आता बोलायचं झालं येथील विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्या बद्दल, तर मागील 30 वर्षांपासून या मतदार संघात शिवसेनेचाच आमदार निवडून आला आहे. व सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले संजय रायमुलकर हे येथील मागील तीन टर्म चे आमदार असून त्यांच्या आधी पंधरा वर्षे आमदार असलेले केंद्रीय मंत्री, खासदार प्रतापरावजी जाधव हे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. यासोबतच संजय रायमुलकर हे मूळचे याच मतदारसंघातील असून मागच्या निवडणुकीच्या वेळेस ते तब्बल साठ हजारांच्या लीडने विजयी झाले होते. तसेच मागील अडीच वर्षात संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून या मतदारसंघात विविध विकास कामे झाली असून मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल ४५०० कोटींचा निधी मिळवण्यात संजय रायमुलकर यांना यश आलं आहे. तर भूमिपुत्र असणं, शिवसेनेचा बालेकिल्ला, खासदार प्रतापराव जाधव यांची मिळणारी साथ व मागील निवडणुकीत मिळवलेला दणदणीत विजय या सगळ्यामुळे संजय रायमुलकर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते. तिथेच शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात कुठेतरी बॅक फुटवर जाताना दिसतात.
तर तुमच्या मते मेहकर मध्ये कोण येणार? मेहकर मधील जनता कोणत्या शिवसेनेला कौल देणार? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा