दसरा मेळाव्याला आहे ‘हा’ मेन्यू, प्रताप सरनाईक यांनी सांगितली यादी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत. प्रत्येक आमदारावर काही ना काही जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोणी वाहनांचे बुकिंग सांभाळलेले आहे तर कोणी सभास्थळ्याचे नियोजन व्यवस्था पाहत आहे. कोणाकडे स्टेज आणि त्यासंदर्भातील नियोजन आहे. दरम्यान शिंदे सैनिकांसाठी जेवणाची व्यवस्था अचूक ठेवण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.तब्बल दोन लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था एवढी मोठी जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक सांभाळत आहेत.
राज्यातील विविध भागातून शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्ते येणार आहेत. या शिवसैनिक कार्यकर्त्यांसाठी विशेष मेनूची आखणी करण्यात आलेली आहे. खाद्यपदार्थ खराब होऊ नये, अशा पद्धतीने मेनू निवडण्यात आलेला आहे अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.धपाटे, चटणी, कचोरी आणि एक गोड पदार्थ असा मेनू निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे पोट भरेल तसेच अन्नपदार्थ खराब होण्याची भीतीही राहणार नाही अशी माहिती सरनाईक यांनी दिलेली आहे. प्रशांत कॉर्नरच्या मालकाने दोन लाख लोकांचे जेवण तयार करण्याची जबाबादारी घेतली आहे असेही सरनाईक म्हणाले. सरनाईक स्वतः खाद्यपदार्थ तयार होणाऱ्या कारखान्यात उपस्थित होते आणि कामाची पहाणी करत होते. खाद्यपदार्थांचा दर्जा उत्तम आणि टीकावू यावर भर देण्यात आलेली आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी स्थापन केलेल्या समता नगर परिसरातील देवीच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांची मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र, मतदारसंघात भाजपच्या वतीने सुरू असलेल्या प्रचाराच्या विरोधात प्रताप सरनाईक नाराज असल्याचे मधल्या काळात दिसून आले होते.