मिशन १८८ ! शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान !!

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले. राज्यात शिंदे गटाला भरभरून पाठिंबा मिळाला. फक्त आमदाराच नाहीत तर खासदारांनीदेखील शिंदे गटाला साथ दिली. त्यानंतर नगरसेवक, गटनेते, शाखाप्रमुख अनेकांनी शिंदेंचा हात धरला. तर दुसरीकडे शिवसेनेला उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.युवानेता आदित्य ठाकरेही सक्रिय झाले असून राज्यभर शिवसंवाद यात्रा करत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शिवसेना ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. एक एक पाऊल पुढे टाकत शिंदेंनी जबरदस्त प्लॅन तयार केला आहे. 

शिवसेनेची पक्ष संघटना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावं या महत्त्वाच्या मागण्या आहेत. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक जरी मोठ्या प्रमाणात फुटले असले तरी शिवसेना संघटनेवर ताबा मिळवणे एव्हढे सोपे नाही हे एकनाथ शिंदे यांना माहित आहे. 

आता शिंदेंनी आपला मोर्चा शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतील सदस्य कसे फोडता येतील याकडे वळवला आहे. पक्षबंदी कायद्यानुसार फक्त आमदार आणि खासदार फुटले म्हणजे पक्षात फूट पडली असा अर्थ होत नाही त्यासाठी संघटनेतसुद्धा फूट असणे आवश्यक आहे. 

शिवसेना संघटनेत २८२ सदस्यसंख्या असून १८८ सदस्य फोडण्याच्या तयारी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. जर यात शिंदेंना यश आले तर हे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. समजा एकनाथ शिंदे यांनी १८८ सदस्य आपल्या बाजूने वळवले तर शिवसेनेत उभी फूट पडल्याच्या दाव्याला बळकटी मिळेल.ही गोष्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलीच माहित आहे म्हणून त्यांनी संघटना बळकट करण्यावर जास्त भर दिला आहे. 

‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे शिवसेनेच्या घटनेत आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे.तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये १४ सदस्यांपैकी ९ सदस्यांना निवडून देण्याचे अधिकार आहेत. उर्वरित पाच जागांवरील सदस्यांची निवड पक्षप्रमुख करत असून दर पाच वर्षांनी हे सदस्य निवडले जातात.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांची हकालपट्टी केलीय. तर सुधीर जोशी यांचे निधन झाल्यामुळे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एक जागा अगोदरच रिक्त आहे.  त्यामुळे आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्यासह फक्त नऊ सदस्य उरले आहेत आणि शिवसेनेच्या घटनेनुसार संघटनेत कोणतेही बदल करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. यात ही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यकारणीत सदस्यांमध्ये मतभेद असतील तरी  शिवसेना पक्षप्रमुखांचा कौल हा अंतिम असतो. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.