राठोड यांना मंत्रिपद दिलं, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आरोप झालेल्या संजय राठोड यांचा शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यामुळे भाजपमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भापज नेत्या चित्रा वाघ यांनी तर ट्विट करत राठोडांना मंत्रिपद दिलं जाणं हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तर संजय राठोड यांनी मंत्रीपद देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा असून, चित्रा वाघ यांची टीका वैयक्तिक असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
संजय राठोड यांनी शपथ घेताच चोहोबाजूंनी शिंदे सरकारवर टीका होते आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाच संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिलेली होती. म्हणून त्यांना आपल्या सरकारमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचे काहीही म्हणणे असेल तर ते ऐकून घेतले जाईल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे.
जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला होता तेव्हा संजय राठो़ड शिंदेंसोबत ठाम राहीले होते. शिंदे सुरतला जाण्यापूर्वी संजय राठोड त्यांच्या सोबत सतत वावरताना दिसत होते.बंजारा समाजाचा एक मोठा वर्ग संजय राठोड यांच्यासोबत आहे त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चत आहे हे मानले जात होते. मंत्रिमंडळ विस्ताराला अवघी काही मिनिटे बाकी असताना त्यांना निरोप मिळाल आणि ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. जेव्हा ते बैठकितून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.