‘आता मनसे देणार ५० खोके’, कोकणात शिंदेंना डिवचले !

पन्नास खोके सगळे ओके ही घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर प्रसिद्ध झाली. विधानसभेच्या अधिवेशनातसुद्धा पन्नास खोक्यांची घोषणा जोरदार गाजली. त्यानंतर ५० खोके असे लिहीलेला बैल किंवा ५० खोक्यांची थाळी वेगवेगळ्या कारणांनी राज्यात ५० खोके सतत चर्चेत असतात. आता पन्नास खोके चर्चेत आले आहेत ते दांडीया स्पर्धेमुळे. यावेळी शिवसेना किंवा राष्ट्रवादीने नाही तर चक्क मनसेने पन्नास खोक्यांचा टोला लगावलेला आहे.
खेडमधील मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आगामी नवरात्रौत्सवमध्ये रास दांडीया स्पर्धा आयोजित केली आहे. यानिमित्त एक खास पोस्टर तयार करण्यात आलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल होतंय. विशेष म्हणजे या दांडीया स्पर्धेतील विजेत्यांसाठी वैभव खेडकर यांनी खास ट्रिप आयोजित केलीय. गोवाहाटी, सुरत, गोवा येथे ते विजेत्यांना पाठविणार आहेत तर उत्तेजनार्थ बक्षिस म्हणून ५० खोके ठेवण्यात आलेले आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलंच व्हायरल होतंय.
यावर्षीच्या स्पर्धेत अभिनव बक्षिसे ठेवण्याचा मानस माझ्या कार्यकर्त्यानं व्यक्त केला होता. त्यामुळे विजयी होणाऱ्यांना आम्ही गुवाहाटी, सुरत आणि गोव्यात राहण्याची संधी मिळणार असल्याचं वैभव खेडेकरांनी सांगितलं. मनसेच्या या दांडीय स्पर्धेची चर्चा मात्र आता राज्यभर रंगली आहे.