मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीवर मनसेने पुन्हा हल्लाबोल केला आहे. ‘तुमच्या मनात हा पझेसिव्ह पणा का आहे?हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?’ असा प्रश्न मनसेने विचारला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे त्यात ‘काँग्रेस ने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाली नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्हपणा का आहे? हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?’ असे म्हटले आहे.
मनसेने या आधी ‘अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे’ “simpathy”#मुलाखत असे ट्विट केले होते. तर काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर एक व्यंगचित्र टाकून टीका केली होती. त्यामध्ये मुलाखतीचा स्टुडिओ दिसतो आहे. संजय राऊत एक पेपर उद्धव ठाकरे यांच्या हातात देत आहेत आणि म्हणत आहेत, हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तर. यावर उद्धव ठाकरे म्हणत आहेत,बघं आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं. या व्यंगचित्रात संजय राऊत यांच्या हातात घड्याळ दिसत असून ते त्यांनी मागे लपविलेले पहायला मिळते आहे. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंवर अशी टीका होतेय की ते शरद पवार जसे बोलतात तसेच वागतात. या सर्व गोष्टीवर व्यंगचित्रातून भाष्य करण्यात आलं होतं.