मोहित कंबोज महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का?

शिंदे-फडणवीस सरकारचे आज पहिले पावसाळी अधिवेशन होते. आजच्या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलच वातावरण तापेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती मात्र नेमकं अधिवेशाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू मोहित कंबोज यांनी ट्विट बॉम्ब टाकला आणि राजकारणात एक मोठा स्फोट झाला. बरं एक ट्विट करुन कंबोज थांबेल नाहीत एकपाठो एक असे अनेक ट्विट त्यांनी केले. मलिक-देशमुख-राऊतांबरोबर राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता तुरुंगात जाणार असा दावा त्यांनी ट्विटमधून केला. सिंचन घोटाळा असं लिहीत त्यांनी आपला रोख अजित पवार आहेत असे प्रत्यक्षपणे सांगितलं.ती फाईल आता उघडली जाणार असे सुतोवाचच जणू काही कंबोज यांनी केले. यामुळे अधिवेशनातील दिशाच एकदम बदलून गेली. विविध प्रश्नांवर चर्चा होणार असे म्हणताना सगळ्यात पहिला प्रश्न होता तो कंबोज यांनी केलल्या ट्विटचा. भले राष्ट्रवादीचे नेते म्हणाले हा ईडीचा चौकिदार आहे का, जीएसटी, शेतकरी प्रश्नावर तो का बोलत नाही पण कंबोज यांच्या एका ट्विटमुळे अधिवेशनातील वातावरण बदललं हे मात्र निश्चत आहे. 

आज दिवसभर कंबोज यांची चर्चा सगळीकडे होती दरम्यान एक गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मोहित कंबोज महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का? खास करुन सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु झालेली आहे. भाजप जेव्हा विरोधत असतं तेव्हा किरीट सोमय्या जोशात काम करतात. एक एक नेता पकडून त्याच्यावर केलेले आरोप, कागदपत्र, पुरावे गोळा करुन पत्रकार परिषद घेतात. राज्यात सोमय्यांची सवय आता सगळ्यांना माहित झालेली आहे. नेमक्या याच वाटेवक कंबोज जात आहेत का असा प्रश्न अनेकांना पडलाय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेला २५ लाख रुपये घेतल्याच आरोप असो वा मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेवर आरोप करत उद्धव ठाकरे सरकारवर केलेली टीका असो.शाहरुख पुत्र आर्यन खानची ड्रग्ज केस आपल्याला आठवत असेल. त्यात अनेकवेळा कंबोजांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि मग नवाब मलिक यांनी ते आरोप कसे खोटे आहेत ते सांगावे  मलिक लवकरच जेलमध्ये जाणार, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आणि काही दिवसात मलिक तुरुंगात गेले. किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यात अनेक समान दुवे आहेत. दोघे विरोधीपक्षावर तुटून पडतात. ट्विटच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषद घेवून विरोधीपक्ष नेत्यावर आरोपांचा घणाघात करतात. आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते संबंधित यंत्रणांना देणार असेही सांगतात. बरं या सगळ्यात भाजप या दोघांची चांगलीच पाठराखण करते. 

दरम्यान सोमय्या आणि कंबोज हे चौकशी यंत्रणांचे एजंट आहेत? असे सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज उपस्थित केला आहे. तर कंबोज यांच्यावर लक्ष देवू नका ते ते महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या आहेत असे पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. म्हणून कंबोज हे नवे सोमय्या आहेत का अशी चर्चा रंगलेली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.