MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आयोगाने बदल करण्याचे ठरविले आहे. अ आणि ब गटातील पदांची संयुक्त पूर्व परीक्षा एकत्र होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून करण्यात आली आहे. एकूण १८ पदांसाठी ही एकत्रित परीक्षा होणार आहे त्यामुळे आयोगावरील ताण कमी होणार आहे. २०२३ मधील परीक्षांसाठी हा बदल लागू होणार आहे.
कोरानामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. परीक्षांची वाढती संख्या आणि आयोगावर येणार ताण यामुळे अ आणि ब गटातील पदांची संयुक्त पूर्व परिक्षा एकत्रपणे घेण्यात येणार आहे.एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमवारी ही माहिती दिली. तसेच स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणारे सर्व राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गाकरिता यापुढे वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड करण्यात येतील.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक भरतीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारिरीक चाचणीत ७० गुण आवश्यक आहेत. याआधी ही मर्यादा ६० गुणांची होती. त्यामुळे पीएसआय भरतीमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेतील गुणांसह, शारीरिक चाचणीत 70 गुण असतील तरच उमेदवार पुढील मुलाखतीस पात्र ठरणार आहे. तसेच अंतिम निवड ही मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीमध्ये मिळालेलेल गुण यांच्या आधारावर करण्यात येईल
राज्यातील पेपरफुटीची प्रकरणे लक्षात घेता आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेला सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीसीटीव्हीकॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या दरम्यान तसेच परीक्षेनंतरच्या नंतर कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.यात उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाईही केली जाणार असल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.विद्यार्थ्याने जर परीक्षेकरिता नियुक्त कर्मचारी आणि आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे, असे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे