उद्धव ठाकरेंची कोंडी, दसरा मेळाव्याला महापालिकेने परवानगी नाकारली !

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना यासाठी हायकोर्टात गेलेली असून शिंदे गटसुद्धा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कसाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतोय. दरम्यान शिवाजी पार्क येथे  दसरा मेळाव्याला कुणालाच जागा मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेने घेतलेले आहे. महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारलेली आहे. महापालिकेकडून ठाकरे आणि शिंदे गटाला तसे पत्र पाठविण्यात आलेले आहे असेही समजले आहे. 

दसरा मेळावा संदर्भात मुंबई महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का? यासंदर्भात अभिप्राय मुंबई पोलिसांकडून देण्यात आला. त्यात मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून पत्रात सांगितले आहे अशी माहिती समोर आलेली आहे.  मुंबई महापालिका आयुक्त परिमंडळ 2 यांनी परवानगी नाकारल्याचं पत्र दोन्ही गटांना दिलंय. 

दसरा मेळाव्यावरुनही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही गटात गणपती विसर्जनावेळी राडा झाला होता. दादर, प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसैनिक आमने-सामने आले होते. यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिंकांनी केला होता. याप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवरच असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.