सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर आनंद महिंद्रांनी घेतली शपथ; म्हणाले

‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये, आनंद महिंद्र यांनी यापुढे गाडीतून प्रवास करताना सीट बेल्ट लावूनच प्रवास करण्याची शपथ घेतली आहे.
सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडय़ाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कार पुलाच्या कठडय़ाला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात येते आहे.
सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नसल्याची माहिती समोर आल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी यापुढे नेहमी सीट बेल्ट लावणार अशी शपथच घेतली आहे. ते ट्वीट करत म्हणालेत की, “गाडीच्या मागील सीटवर असतानाही मी नेहमी सीट बेल्ट लावण्याचा संकल्प करत आहे. तुम्ही सर्वांनीही ही प्रतिज्ञा घ्या असं मी आवाहन करतो. आपल्या कुटुंबाला आपण हे देणं लागतो”.