नांदेडमध्ये नरबळी? मृतदेहाशेजारी अघोरी पुजेचं साहित्य आढळलं !

नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील वाशीच्या जंगलात एका युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडलाय.या मृतदेहाची चर्चा सगळीकडे होतेय कारण या मृतदेहाशेजारी अघोरी पूजेचे साहित्य आढळलंय. त्यामुळे मयत तरुणाच्या कुटुंबियांनी नरबळीची शंका उपस्थित केलीय. हिमायतनगर शहरात राहणाऱ्या 32 वर्षीय पांडुरंग तोटेवाड या युवकाचा हा मृतदेह असल्याची ओळख पटलीय. तसेच मृतदेह आणि अघोरी पूजेचं साहित्य आढळलेल्याचा एक व्हिडीओही नांदेडमध्ये सध्या व्हायरल झालाय.
मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, त्या ठिकाणी अघोरी पुजेचं साहित्य सापडल्यानं अनेक शंका घेतल्या जातायेत. मृत तरुणाचा चेहराही छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आलाय.दगडाने ठेचून निर्घृणपणे या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघा पुरुषांवर गुन्हा दाखल केलाय. कलम 302, 34 अन्वये एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.
बालाजी तोटेवाड यांनी तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलीय.या तरुणाची जुन्या वादातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय. परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांनी संगनमताने हे हत्याकांड केलं, अशी तक्रार हिमायतनगर पोलीस ठाण्यात देण्यात आलीय.धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी लिंब, तांब्या आणि फुलं आढळून आली आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे.