आजपासून ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशव्यापी आंदोलन

सैन्य भरतीमधील ‘अग्निपथ’ योजनेला आता किसान मोर्चा कडाडून विरोध करणार आहे. राकेश टिकैत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. माजी सैनिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन टीकैत यांनी केले आहे. संयुक्त किसान मोर्चा, माजी सैनिकांचा संयुक्त मोर्चा आणि अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विविध युवा संघटना यात सहभागी होणार असून संयुक्तपणे आपल्या मागण्या मांडणार आहेत.
7 ते 14 ऑगस्टपर्यंत’अग्निपथ’ विरोधात किसान मोर्चासोबत निघालेल्या इतर संघटनांची संयुक्त मोहीम चालणार आहे. त्याअंतर्गत अनेक ठिकाणी ‘जय जवान जय किसान’ संमेलन आयोजीत करण्यात येणार आहे. अग्निपथ योजना म्हणजे अखंडपणे परिश्रम घेतलेल्या उमदेवारांचा विश्वासघात आहे असेही किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबाने आपल्या मुलांना सैन्यदलात पाठवून देशासाठी योगदान दिलं त्यांच्यासाठी ‘अग्निपथ’ योजना म्हणजे धक्का आहे असेही म्हटले आहे.युनायटेड फ्रंट ऑफ एक्स-सर्व्हिसमनच्या वतीनं लष्कराची नवीन भरती योजना तरुणांच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं सांगण्यात आलंय. ‘अग्निपथ’ योजना तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या मोहिमेतून करण्यात येणार आहे.