अजितदादा फडणवीसांची जागा घेणार?

राज्यात भाजप-एकनाथ शिंदे गटाचे नवे सरकार स्थापन होण्याची औपचारिकताच आता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे साहजिकच आता राज्याचा पुढचा विरोधी पक्षनेता कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीत शिवसेना हा सर्वाधिक आमदार असलेला पक्ष होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार फोडून नेल्याने शिवसेनेकडे अवघे १६ आमदार उरले आहेत. त्यामुळे आता ५३ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा असून विरोधी पक्षनेता हा त्यांचा असेल, हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार हेच विरोधी पक्षनेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत आमदारांकडून अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्याची मागणी करण्यात आली आहे. या पदाला अजितदादांच योग्य न्याय देऊ शकतात, असे मत आमदारांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कोण असेल, याचा निर्णय घेईल. विरोधी पक्षनेता हा म्हणजे एकप्रकारे ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो, असे राजकारणात सर्रास म्हटले जाते. या पदाची ताकद आणि प्रभाव काय असू शकतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये दाखवूनच दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळणे, ही त्यांच्यासाठी आणखी एक मोठी संधी असू शकते.
विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांनी सभागृहात जोरदार फटकेबाजी केली होती. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी आपल्या विरोधकांना शाब्दिक चिमटे काढले होते. त्यांनी राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांच्यासह राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली होती. अजित पवार यांच्या या भाषणामुळे या चर्चेचा चांगलीच रंगत आली होती.