रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले…

माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भातील काही फोटोही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवल्याचं कदम यांनी सांगितलं. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली आणि आता स्वतःची कृती योग्य आहे असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे,” असं मत महेश तपासे यांनी व्यक्त केलं.

शिवसेना पक्ष फुटण्याला हे बंडखोर आमदारच जबाबदार आहेत, असं महेश तपासे म्हणाले. त्यांनी मातोश्रीसोबत दगाफटका केला. ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि याचं खापर जाणून बुजून राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडण्याचा केविलवाणा प्रकार केला जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनात तयार झाली आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनाही यात सामील करून घेतलं. हे सगळ्या देशाने बघितलं आहे.”

“शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं तेच लोक मातोश्रीचे गद्दार झाले”
“शिवसेना फोडण्यात शिंदे गट होता आणि याची आखणी भाजपच्या मार्गदर्शनानुसार झाली. २०१९ ला सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही सत्ता मिळाली नाही. म्हणून भाजप सैरभैर झाला होता आणि यातूनच त्यांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं. यासाठी पोलिसी बळाचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहात आहे. ज्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं, आज तेच लोक मातोश्रीचे गद्दार झाले आहेत,” असा आरोप तपासे यांनी बंडखोर गटावर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.