रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार?

राज्यातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागलेला पहायला मिळतो आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेंही सध्या कारागृहात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत. आता ईडीच्या रडारवर आहेत आमदार रोहित पवार ! त्यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे.
ग्रीन एकर कंपनीचे रोहीत पवार सीईओ असून ईडीने प्राथमिक चौकशी केलेली आहे. राकेश वाधवान हे देखील या कंपनीच्या संचालकपदी होते त्यामुळे रोहीत पवार यांच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा सुरु झालेली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
२००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे सुद्धा होते. लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे जवळचे आहेत. राकेश वाधवान यांच्यासोबत लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये पार्टनर होते. ग्रीन एकर्स प्रा.लि. या कंपनीमुळेच रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. आता या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली आहे तसेच मोठी रक्कम देशात आली आहे. याची चौकशी व्हावी, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. या तक्रारीवर ईडीकडून चौकशी करण्यात येत असून प्राथमिक तपास सुरू झालेला आहे. रोहित पवार यांचे वाधवान यांच्याशी संबंध आहेत, का हेही तपासले जात असल्याचं सांगण्यात येते आहे. त्यामुळे भविष्यात रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, अशी चर्चा रंगलेली आहे.