‘पासपोर्ट’ बनवणं झालं सोप्पं, ‘या’ दाखल्यासाठी होणारी धावपळ थांबणार…!

पासपोर्ट तयार करणे म्हणजे फार कटकटीचे काम आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. पासपोर्ट काढताना अनके प्रक्रियेतून जावं लागतं शिवाय अनेक कागदपत्र देखील जमा करावी लागतात. यासगळ्यात महत्त्वाचे आहे ते पोलिस व्हेरिफिकेशन अर्थात ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ ते असल्याशिवाय पासपोर्ट दिला जात नाही. रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा हवा असेल किंवा इमिग्रेशनसाठी अर्ज करायचा असेल तर ‘पोलिस व्हेरिफिकेशन’ अगदी गरजेचे आहे. दरम्यान जे पासपोर्ट बनवून घेत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे आता केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलेला आहे.
आता ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी अर्जदारांना सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये अर्ज करता येणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे. याचा फायदा परदेशात नोकरी शोधणाऱ्या भारतीयांसह अनेकांना होणार आहे. यासंदर्भात एक निवदेन जारी करण्यात आलेले आहे. त्यात मंत्रालयाने भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना ‘पीसीसी’साठी अर्ज करण्याच्या सुविधेसह जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता पासपोर्ट अर्जदार ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी सर्व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर (POPSK) ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा 28 सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे. त्यासाठी आगाऊ अपॉइंटमेंटसुद्धा घेता येणार आहे. गेल्या काही महिन्यात ‘पीसीसी’च्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे निवदेनात म्हटलेले आहे.