स्मार्टफोनमध्ये ‘हे’ अॅप ठेवणं बंधनकारक, मोबाईल कंपन्यांची डोकेदुखी वाढली….

देशात आजपासून 5G सेवेचा शुभारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात आलेली आहे. दरम्यान मोबाईल उत्पादक कंपन्यांनीही आपले 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेऊन ग्राहकही हे स्मार्टफोन खरेदी करतील यात शंकाच नाही पण थोडं थांबा ! कारण केंद्र सरकार लवकरच स्मार्टफोनबाबत एक नवा नियम आणणार असून त्यामुळे मोबाईल उत्पादक कंपन्यांचीही डोकेदुखी वाढणार आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, मोबाईल कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ‘नाविक’ हे स्वदेशी नेव्हिगेशन अॅप ठेवणे अनिवार्य करण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२३ पासून या नव्या नियमांची कडक अंमबजावणी होणार आहे. स्मार्टफोनमध्ये जर हे अॅप इनबिल्ट नसेल, तर कंपन्यांना मोबाईल विकता येणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय.
केंद्रीय अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या स्मार्टफोनमध्ये ‘गुगल मॅप’ इनबिल्ट असते. त्याच धर्तीवर आता मोबाईल उत्पादक कंपन्यांना ‘नाविक’ हे स्वदेशी नेव्हिगेशन अॅपसुद्धा मोबाईलमध्ये ‘इनबिल्ट’ करावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी अतिरिक्त भांडवल त्याचबरोबर कमी वेळ मिळाल्याने मोबाईल कंपन्या त्रासलेल्या आहेत.
‘नाविक’ एक ‘स्वदेशी नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ असून ते ‘इस्रो’द्वारा विकसित करण्यात आलेले आहे. २००६ मध्ये सर्वप्रथम हे विकसित करण्यास सरकारने मंजूरी दिली होती. त्यावेळी त्यासाठी १७४ कोटींचा निधी दिला होता. २०११ पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य होते पण २०१८ मध्ये त्याची सुरूवात झाली. दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या या नव्या नियमांमुळे मोबाईल कंपन्या त्रासलेल्या आहेत. सॅमसंग, शाओमी, ॲपलसारख्या कंपन्यांनी तर ही नवीन सिस्टीम लागू करण्यासाठी 2 वर्षांचा अवधी मागितलेला आहे. ही सिस्टिम लवकर लागू केल्यास, मोबाईलच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो.