राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत येणार, कारण…

राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हापासून विधानपरिषदेवरील 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली लागला नव्हता. आता शिंदे सरकार आलं तेव्हा पुन्हा या आमदारांच्या निवडीचा मुद्दा नव्याने चर्चेत येत आहे. यासाठी कारण ठरलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना दिलेली ती आमदारांची यादी रद्द करावी अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता पुन्हा एकदा चर्चेत येणार आहेत. राज्यपाल यावर काय निर्णय घेतात याबाबत चर्चा रंगली आहे.
विधान परिषेदवर 12 आमदार राज्यपाल नियुक्त असतात.त्यानुसार राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच तीन्ही पक्षांकडून 12 नावाची यादी ही राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.आता शिंदे सरकारची स्थापना होताच महाविकास आघाडी सरकारने दिलेली ती यादी रद्द करण्याची मागणी होतेय.
मविआने दिलेली यादी रद्द करुन आता शिंदे सरकारकडून देण्यात आलेल्या यादीवर विचार करावा असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तेव्हा आता राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पहावे लागेल. दरम्यान मविआने दिलेली यादी जर राज्यपाल यांनी रद्द केली तर आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.तेव्हा आता शिंदेंच्या पत्रावर राज्यपाल काय निर्णय देतात ते पहावं लागेल.