महंतांनी शिवबंधन बांधलं, राठोडांना ठाकरी झटका !

शिवसेनेत दोन गट तयार झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून समोर आलेले आहेत. दोघांचा संघर्ष जोरदार सुरु असून आपणच खरी शिवसेना हे दाखविण्यासाठी दोन्ही गटात जणू काही अटीतटीची लढाई सुरु आहे. दरम्यान ठाकरे यांनी शिंदे गटाला कोंडीत पडण्यासाठी एक महत्त्वाची रणनीती आखली होती त्याला यश मिळालेलं आहे. शिंदे गटातील मंत्री संजच राठोड यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात ठाकरेंनी जोरदार टक्कर दिलेली आहे.
बंजारा समाजाचा चेहरा म्हणून राठोडांकडे पाहिले जात होते. परंतु आता राठोडांनाच टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत फक्त चर्चा सुरु होत्या. असे काही होणार नाही असे ही म्हटले जात होते पण अखेर महंतांनी स्वत: हा खुलासा केलेला आहे. महंत सुनील महाराज हे शिवबंधन बांधणार असल्याचं समोर आले आहे.
बंजारा समाजाचे तसेच समाजहिताचे काही प्रश्न घेवून तसेच पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत गेलो होते. तिथे मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो पण तिथे मिळालेली वागणूक न सांगण्यासारखी आहे. त्यांनी मला कार्यालयात ४ तास थांबवून ठेवले. त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी अवघी १० मिनीटेसुद्धा वेळ दिला नाही. त्यांच्या वागण्यावरुन हेच जाणवत होते की माझी उपस्थिती त्यांना खटकत होती असे महंत म्हणाले. असे जरी असले तरी सामाजिक, धार्मिक कार्यात माझे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. परंतु राजकीय मैदानात माझे आणि संजय राठोड यांचे संबंध राहणार नाहीत असे महंत सुनील महाराज म्हणालेत.
बंजारा समाजासाठी, बहुजन आणि बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेत करण्यासाठी मी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले आहे. आता तर बंजारा संत, महंतांची भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे पोहरादेवीत जाणार असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. बंजारा समाजाचे महंत हाती शिवबंधन बांधणार असल्याने मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राठोडांनी ठाकरेंनी दिलेल्या धक्क्यामुळे बंजारा वोट बँक कशी शाबूत ठेवायची हा प्रश्न शिंदे गटाला पडण्याची शक्यता आहे.