बुलबुल पक्षाच्या पंखावर बसून विनायक दामोदर सावरकर देशभ्रमंती करायचे !!

विनायक दामोदर सावरकर बुलबुल पक्षाच्या पंखावर बसायचे आणि दररोज त्यांच्या मातृभूमीच्या भेटीसाठी जायचे. कानडी भाषेच्या पुस्तकात हे लिहीलेलं आहे. सेल्युलर जेलमध्ये सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाचे वर्णन या पुस्तकातील एका धड्यात करण्यात आलेले आहे. कर्नाटक शाळेमधील कानडी भाषेच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकातील या परिच्छेदामुळे नवा वादंग आता निर्माण होणार आहे. या परिच्छेदाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून पुस्तकातील या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी आहे, रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती. या समितीने कानडी भाषेच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात एक धडा समाविष्ट केला होता. ब्लड ग्रुप असे या धड्याचे नाव आहे. त्यात के. टी. गट्टी यांनी अंदनामातील सेल्युलर जेलला भेट दिली. या धड्यात या भेटीचे प्रवासवर्णन दिलेले आहे. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी याच तुरुंगात ठेवलं होतं. या धड्यात सावरकरांच्या मातृभूमीवरील प्रेमाचं वर्णन करण्यात आलेलं आहे मात्र हे वर्णन अतिरंजक असून त्यावर आक्षेप घेण्यात येतोय. या परिच्छेदाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक टेक्स्टबुक सोसायटीकडे अनेकांनी तक्रार नोंदविल्याची माहिती समोर आलेली आहे.
शिक्षकांनी देखील या परिच्छेदावर आक्षेप घेतलेला आहे. या धड्यात जी वाक्य आहेत त्याला तथ्य स्वरुप द्यायला हवे होते. विद्यार्थ्यांना हे समजावून सांगणे अतिशय कठिण आहे. विद्यार्थ्यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यास, त्याबद्दल पुरावे मागितल्यास आम्ही काय करायचं? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.