एकनाथ शिंदे गटाचं पक्षचिन्ह आणि नाव ठरलं? निवडणूक आयोगाला पत्र लिहून मांडणार भूमिका

आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवल्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर करणे महत्त्वाचे आहे. आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार नाही पण तरीसुद्धा चिन्ह आणि नाव महत्त्वाचे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून तीन चिन्ह दाखवली असून, तीन पर्यायी नावे सुद्धा सांगितली आहेत.
काल पक्ष चिन्ह आणि नावा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत पक्षचिन्ह आणि पक्षाचं नवं नाव काय असेल याची चर्चा झाल्याची माहिती हाती आलेली आहे. शिंदे गटाच्या कार्यकारिणीला नाव आणि चिन्ह निवडण्याचा अधिकार आहे हे बैठकित प्रथम स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात शिंदे गट आता निवडणूक आयोगाला पत्र लिहून यासंदर्भातली विनंती करणार आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्याचा निर्णय शनिवारी आला. त्यानंतर रविवारी विविध बैठका झाल्या त्यात ही बैठक महत्त्वाची होती.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली त्यात पक्षाचं नवं चिन्ह म्हणून तुतारी, गदा आणि तलवार या तीन चिन्हांवर चर्चा झाली अशी माहिती हाती आलेली आहे. या पैकी एक चिन्ह शिंदे गटाला हवे आहे असे सांगण्यात आले. तर नावाबाबत शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब या दोन नावांपैकी एक नाव दिले जावे अशीही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. याबाबत शिंदे गटाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र अंधेरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चिन्ह आणि नाव लवकर निवडावं लागणार आहे असे चित्र स्पष्ट आहे. आता शिंदे गट काय निर्णय घेणार? त्यांच्या गटाचं चिन्ह काय असणार हे लवकरच कळेल.