दसरा मेळावा आणि ते १० कोटी शिंदेंच्या खर्चाची चौकशी होणार?

मुख्यमंत्री शिंदे यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. या पैशांचा स्रोत काय आहे? असा प्रश्न एका याचिकेच्या माध्यमातून विचारण्यात आलाय.या खर्चाची चौकशी व्हावी असे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीय.सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी ही याचिका दाखल केली असून त्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दीपक जगदेव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत केलेल्या या याचिकेवर १४ ऑक्टोबरला प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.
बीकेसीतल्या दसरा मेळाव्यासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये कुठून आले, त्यांना ते कोणी उपलब्ध करून दिले? शिंदेंच्या समर्थकांना आणण्यासाठी एसटीच्या १८०० गाड्या आरक्षित करण्यात आल्या त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांची गैरसोय झाली. याची चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीय.
समर्थकांना आणण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अजूनही अपूर्ण आहे. पण तरीही त्याचा वापर करून वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं, त्याचीही चौकशी करा अशी मागणी करण्यात आलीय.एकूणच या मेळाव्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असून हा अवैध खर्च व अन्य सर्व मुद्द्यांबाबत सीबीआय, ईडी किंवा मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.