केसरकरांना मंत्रिपद हा राणेंना धडा?

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि शिंदे गटातील ९ जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे गटामधील एका नेत्याला मंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमधील एका नेत्याच्या अडचणी भविष्यकाळात वाढू शकतात. तसेच त्यांच्या मतदारसंघातच आव्हान उभं राहू शकतं. आम्ही बोलतो आहोत दीपक केसरकर यांच्याबद्दल शिंदे गटात आल्यानंतर त्यांनी अतिशय संयमपणे शिंदे गटाची बाजू सगळ्यांसमोर मांडली. त्याचे फळ केसरकरांना मिळाले त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
आता मंत्रिपद मिळाल्यानंतर केसरकरांचा थेट सामना होणार तो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत. आपल्याला माहित आहेत केसरकर आणि राणे दोघेही कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. राणेंचा बालेकिल्ला म्हणजे सिंधुदुर्ग आणि तेथील राजकारणावर राणे पिता-पुत्रांची पकड अगदी घट्ट आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातून केसरकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. तीनवेळा आमदार आणि २०१४मध्ये ते पालकमंत्री होते. जेव्हा त्यांनी शिवसेनेच प्रवेश केला तेव्हा राणेंविरोधात टीकेची झोड उठवली आणि दहशतमुक्त सिंधुदुर्ग असा नारा त्यांनी दिला. यामुळे राणे पराभूत झाले आणि त्याची सल त्यांच्या मनात आजही कायम आहे. केसरकरांमुळे झालेला पराभव राणे कधीच विसरु शकत नाही आणि ती कटूता आजही कायम आहे.
आता शिंदे गटाने केसरकरांना मंत्रिपद देवून काय साधलं तर सिंधुदुर्गात केसरकरांना ताकद दिली आणि राणे गटाला शह दिला. आता मंत्रीपद मिळाल्यामुळे केसकर सिंधुदुर्गात आपली पाळमुळं घट्ट रोवणार यात शंकाच नाही पण याचा फटका राणेंना बसू शकतो.
केसरकर आता जरी शिंदे गटासोबत असले तरी ते शिवसेनेतील आहेत. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचं शिवसेनेसोबतच हाडवैर सगळ्यांना माहितच आहे. काहि दिवसांपूर्वी केसरकरांनी राणेंविरोधात वक्तव्य केलं आणि हा वाद पुन्हा उफाळून आला. आता केसरकरांना मंत्री केल्यामुळे राणेंसाठी आता दुहेरी आव्हान असणार आहे एक आहे ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट. जेव्हा शिंदे गटाने भाजपचा हात धरला तेव्हा कोकणात राणे आणि शिंदेगटातील शिवसेना यांच्यात पॅचअप होईल असे वाटत होते पण केसरकांनी केलेली टीका त्यात राणेंनी आपल्या स्टाईलन दिलेले उत्तर दिले. त्यामुळे आता राणेंसाठी दुहेरी सामना होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेशी आणि शिंदेगटातील केसरकरांशी. आता केसरकर कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे. तेव्हा आता केसरकरांवर टीका करताना राणेंना हात आखडता घ्यावा लागणार अशी चर्चा होते. केसरकर आणि राणे वादात आता कोणी माजी मारणार हे लवकरच कळेल.