शिंदे गटात प्रवेशाची चर्चा,मिलिंद नार्वेकर यांची एक कृती, सगळ्या प्रश्नांचे दिले उत्तर

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार अशा जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत. अगदी शिंदे गटातील मंत्रीसुद्धा भरसभेत याबद्दल विधान करत आहेत. दरम्यान, स्वत: मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एक सूचक ट्विट केलेले आहे.
५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले. pic.twitter.com/hzhh2YBMai
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 3, 2022
मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी सकाळी ट्विट करुन दसरा मेळाव्याच्या तयारीची माहिती दिलेली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे असे नार्वेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दसरा मेळाव्याच्या कामाची काल रात्री पाहणी केली तसेच तिथे सुरु असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवालादेखील भेट दिली अशी माहिती नार्वेकरांनी ट्विटमधून सांगितली आहे
दरम्यान, उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यामधील सभेत केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता मला याबाबत काही माहित नाही असे त्यांनी सांगितले होते.तसे पाहिले तर शिंदे आणि नार्वेकर यांचे खूप चांगले संबंध आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री शिंदे हे नार्वेकरांच्या घरी गणेशोत्सवासाठी गेले होते.तेव्हापासून नार्वेकर शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण मिलिंद नार्वेकर कुठेही जाणार नाहीत, लोकांमध्ये गैरसमज पसरवला जातोय ते योग्य नाही. असे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.