टीईटी घोटाळा, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घोटाळ्यातील यादीत शिंदे गटामधील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान सत्तार यांनी पत्रकार परिषद घेवून, ‘आमच्या विरुद्ध षडयंत्र रचलं जातंय’ असा आरोप केला आहे. ‘या प्रकाराची संपुर्ण चौकशी व्हावी असे पत्र आपणच मुख्यमंत्र्याना देणार आहोत’ असे सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मंत्रिपदाची मला काळजी नाही असेह सत्तार यांनी स्पष्ट केले. मात्र विरोधकांनी सत्तार यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तार यांच्यावर टीका केली असून ‘आता त्यांना शिक्षण मंत्री करा’ असा टोला लगावला आहे. कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते
‘टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवणार आहोत. आता अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील. मग सगळा निकाल लागेल असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. राज्यात अस्थिर वातावरण असेल तर अशा गोष्टी बघायला मिळतात. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. यामुळे बाकिच्या गोष्टी खपून जातात’, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
टीईटी घोटाळ्यावरून आता औरंगाबादमध्ये राजकारण तापलेलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली असून, ‘माझ्याकडे सत्तार यांच्या घोटाळ्यांची फाईल आहे. मी गप्प बसलो होतो कारण आम्ही सहकारी होतो पण आता मी गप्प बसणार नाही’ असा इशारा खैरे यांनी दिला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी विरोधक करत आहेत. आता या प्रकारानंतर भाजप सत्तारांना मंत्रिपद देणार का हा प्रश्न उपस्थि होत आहे.