पुण्यात ७ महिन्यात ८४० महिला बेपत्ता !!

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून बिरुद मिरवीणाऱ्या पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार २०२२ मधील पहिल्या सात महिन्यात एकूण ८४० महिला बेपत्ता झाल्या होत्या. यातील दिलासादायक बाब म्हणजे ३९६ महिला सापडल्या आहेत. पुणे शहर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये पुण्यातून ८४० महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये मे महिन्यात १३५ महिला हरविल्या आहेत अशी नोंद होती
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा जर आपण विचार केला तर याठिकाणी ८८५ महिला बेपत्ता झालेल्या आहेत.तर पुणे ग्रामीण पोलिसांनी याच कालावधीत ७४३ महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली. यातील बहुतेक महिला कौटुंबिक कलह, नातेसंबंध किंवा नोकरीच्या संधी यामुळे घर सोडून जातात. मात्र त्यांना आपली चूक लक्षात आली की त्या परत येतात असे पोलिसांनी सांगितले. साधारण १६ ते २५ वयोगटातील महिला अफेअर्स, भांडण किंवा पालकांसोबत न पटणे यामुळे घर सोडून जातात अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी असेही सांगितले की अशा काही महिला आहेत ज्यांना स्वतंत्र जीवन जगायचे आहे आणि त्यामुळे आपल्या घरातून त्या पळून जातात.
महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असली तरी मानवी तस्करीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे समाजसेवकांचे म्हणणे आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या महिलांची ही सामूहिक संख्या असून कौटुंबिक वाद, नातेसंबंध, प्रियकराकडून लग्नाच्या बहाण्याने आमिष दाखविणे अशी अनेक कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच एकाही दुव्याकडे दुर्लक्ष होत नसून प्रत्येक मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे पोलिस निरीक्षक अण्णा माने यांनी दिली आहे