गणेशोत्सवातल्या गर्दीने वाढवली पुणेकरांची डोकेदुखी !

गणेशोत्सवानंतर पुणेकरांची डोकेदुखी वाढली आहे कारण कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गणेशोत्सवाच्या काळात सरकारकडून सगळे निर्बंध हटविण्यात आले होते. त्यामुळे आगमन, मिरवणूक, विसर्जन अगदी दणक्यात करण्यात आलं होतं. अगदी रात्रीसुद्धा तरुणाई मोठ्या संख्यने रस्त्यावर उतरली होती. दरम्यान राज्यातील २७ टक्के सक्रिय रुग्ण पुण्यात असल्याची माहितीही खात्यातर्फे रविवारी देण्यात आली आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील सक्रिय रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर नऊ दिवसांनी पुण्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य खात्यातर्फे दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. तेव्हा पुणेकरांनो आपली काळजी घेणे फार गरजेचे आहे. महाराष्ट्रातील एकणू सक्रिय रुग्णांपैकी २७ टक्के रुग्ण फक्त पुण्यात आहेत त्यामुळे पुणेकरांबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कोरोनाचा प्रभाव कमी झाला म्हणून जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला पण वाढलेल्या गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात चार हजार ५४० सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सर्वोधिक रुग्ण म्हणजे एक हजार २२२ अर्थात २७ टक्के रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत.