पुरुषोत्तम करंडक स्पर्धेवरुन सुरु झालेला वाद नेमका काय आहे?

एकांकिका स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा नाव मानाने घेतलं जातं. या एकांकिका स्पर्धेन सिनेकला क्षेत्राल अनेक कलाकार दिलेले आहेत. ५७ वर्षांचा इतिहास असणाऱ्या या स्पर्धेत यंदा भूतो न भविष्यती अशी घटना घडलेली आहे. पहिल्यांदाच मानाच्या पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला आहे. एवढेच नाही तर सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागांतही पात्र कलाकार नसल्याने परीक्षकांनी ही पारितोषिकेही कोणालाही जाहीर केलेली नाहीत.
यावर प्रसिद्ध दिग्दर्शक, कलाकार अगदी सामान्य नागरिकांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अत्यंत मानाच्य अशा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेकडे फक्त कॉलेज विद्यार्थी नाही तर सिनेकला क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे सुद्धा लक्ष असते. यंदा स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पौर्णिमा मनोहर, परेश मोकाशी आणि हिमांशू स्मार्त यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.पण त्यांना एकही एकांकिका नंबरात यावी असे वाटले नाही. त्यामुळे आयोजक आणि परिक्षकांनी नंबरातील एक पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला.
करंडकासाठी एकांकिका पात्र नसली तरी सांघिक पारितोषिक दिले जाणार असून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेस जाहीर झाले आहे. या संघास पुरुषोत्तम करंडक मिळणार नसला तरी पाच हजार एक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.परिक्षकांच्या निर्णयामुळे रंगकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे. विजू माने, मुग्धा गोडबोले, रमेश परदेशी, स्नेहल तरडे यांनी नकारात्मक सुर लावलेला आहे. तर किरण माने यांनी परिक्षकांना साथ देत त्यांचा निर्णय योग्य आहे अशी पोस्ट शेअर केली आहे. एकूणच पुरुषोत्तम करंडकाच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण आलंय.