आषाढी एकादशीदिवशी पुणेकरांसाठी खुशखबर !

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणेकरांना आषाढी एकादशीची खुशखबर मिळाली आहे. खडकवासला साखळी धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पुणेकरांना आता दररोज पाणी मिळणार आहे.
जलसाठ्यात पाणीपातळी वाढल्याने पाणीकपातीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा आता सुरळित होणार आहे. सध्याच्या जलसाठ्यानुसार 26 जुलैपर्यंत पुणेकरांना दररोज पाणी मिळणार आहे. 26 जुलैनंतर पाणी वाटपाचा पुन्हा फेरआढावा घेण्यात येईल.
गेल्या आठवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे मुठा नदीच्या प्रवाहातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतील पाणीसाठा 2.5 टीएमसीवर गेला होता. यानंतर राज्याच्या जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) सतर्क केले आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार, पीएमसीने 4 जुलैपासून शहरातील पाणीपुरवठा एका दिवसाआड केला होता. मात्र आता पुणेकरांना दररोज पाणी मिळणार आहे.