राहुल गांधींचा ‘शरद पवार पॅटर्न’; ‘भारत जोडो’ यात्रेतील Video Viral

काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर असून कर्नाटकात झालेल्या त्यांच्या सभेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून त्यावर चर्चा सुरु झाली आहे. तो व्हिडीओ पाहिल्यावर महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आठवण झालेली आहे. २०१९मध्ये शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली होती अगदी त्याचप्रमाणे राहुल गांधी यांची सभा कर्नाटकात पार पडली. 

भारत जोडो यात्रेचा कर्नाटकमधील तिसरा दिवस असून राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर राहुल गांधी मैसूरमधील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केले. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पाऊस सुरु झाल्यामुळे भाषणात अडथळा येईल किंवा राहुल गांधी आपले भाषण संपवतील असे वाटले होते पण तसे काहीही झाले नाही. कोसळणाऱ्या पावसात राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं.

भरपावसात झालेल्या या सभेत राहुल गांधी यांनी भाजप आणि RSS वर घणाघाती टीका केलेली आहे. ही यात्रा नदीप्रमाणे कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत चालेल. या नदीत तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. फक्त प्रेम दिसेल आणि बंधूभाव दिसेल. ही यात्रा थांबणार नाही. आता बघा पाऊस येतोय. पावसालाही यात्रा रोखता आलेली नाही, असे राहुल गांधी यांनी रोखठोकपणे सांगितले. 

राहुल गांधी यांना पावसात भाषण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेची चर्चा सुरू पुन्हा सुरू झाली आहे. पवारांच्या पावसातील त्या सभेने निवडणुकीचं चित्रच बदलून टाकलं होतं आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत आणि सातारा लोकसभा मतदारसंघात घवघवीत यश मिळालं होतं. आता राहुल गांधी यांच्या यात्रेचा आणि या सभेचा परीणाम कसा होतो ते आगामी काळात समजेलच.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.