‘शिवतीर्थ’ला अस्खलित मराठी बोलणाऱ्या ‘बिहारी’ पाहुण्याने दिली भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून तर त्यांची जास्तच चर्चा होतेय. सध्या भाजपा नेत्यांसोबत राज ठाकरेंच्या सुरु असणाऱ्या भेटीगाठीही राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच आज एक विशेष पाहुण्याने राज ठाकरेंच्या दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी हजेरी लावली.
बिहार विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी राज आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकूर यांचं स्वागत केलं. राज यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर भूमीपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरुन उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या परप्रांतियांना विरोध केला होता. राज यांचा परप्रातिंयांविरोधातील लढा चांगलाच चर्चेत ठरला होता. या लढ्यावरुनच काही महिन्यांपूर्वी राज यांच्या अयोध्या दौऱ्यालाही भाजपाचे उत्तर प्रदेश खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर राज यांनी आता उत्तर भारतीयांबद्दल सौम्य भूमिका घेतल्याचं अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ठाकूर यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.
बिहार विधान परिषदेच्या गेल्याच आठवड्यात झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी जनता दलाचे (यू) देवेशचंद्र ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. ठाकूर गेली २० वर्षे बिहार विधान परिषदेचे आमदार आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्यावर ही मोठी जाबदारी सोपविली आहे.
विलासरावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंत्रालयात देवेश ठाकूर यांचा चांगलाच दबदबा होता. राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच मंत्रालयात ठाकूर हे विलासरावांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. मुंबईत त्यांचे वास्तव्य कुलाब्यात आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे ते काही वर्षे उपाध्यक्ष होते. राजकीय महत्त्वाकांक्षा राज्यात पूर्ण होत नसल्याने ठाकूर यांनी बिहार गाठले.आता हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारल्यानंतर हिंदी भाषिकांविरोधातील भूमिकेबद्दल मसनेची भूमिका मवाळ होणार का यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. राज आणि ठाकूर यांची भेट ही नव्या राजकीय समिकरणांच्या नांदीची चर्चा अधिक बळकट करणारी असल्याचं मानलं जातंय.