विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सोबतच महायुतीचे इतर नेते होते. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची मात्र यावेळी अनुपस्थिती दिसली. त्यामुळे शिवसेना शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. म्हणूनच सभापती पदा मागचं नेमकं राजकारण काय आहे? तेच जाणून घेऊयात
मागील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर सभापती असताना नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती होत्या. तर तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यावर विधान परिषदेमध्ये सभापती नसल्याने नीलम गोऱ्हे सभापती पदाचा अतिरिक्त भार देखील सांभाळत होत्या. शिवसेना फुटी नंतर सुरुवातीला नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरें सोबत होत्या. तर “फक्त सभापती पदासाठी नीलम गोऱ्हे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.” अशा चर्चा देखील त्यावेळी होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबतच नीलम गोऱ्हे आता पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
विधानसभेचे अध्यक्ष पद भाजपला मिळाल्या नंतर, विधान परिषदेचे सभापती पद शिवसेनेला मिळावे अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. “विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापती पद द्यावे” अशी मागणी सुद्धा शिवसेनेकडून केली जात होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे कानाडोळा करत भाजपने विधान परिषदेचे सभापती पद सुद्धा आपल्याकडेच ठेवल. त्यामुळे मुख्यमंत्री पदानंतर आता सभापती पदासाठी शिंदे व भाजप मध्ये पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळाला, आणि या संघर्षात देखील भाजपने स्वतःचं च खरं केलं आहे.
आज विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडी कडून अद्याप सभापती पदासाठी कोणीही अर्ज दाखल केला नाहीये. यासोबतच महायुती कडे बहुमत आहे. त्यामुळे आता जवळपास भाजपच्या राम शिंदे यांची निवड झाल्याचं निश्चित असून यासंबंधीची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.
पण एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे काना डोळा करत भाजपने राम शिंदे यांनाच सभापती म्हणून का निवडले? ते आता पाहूयात. राम शिंदे यांना सभापती करण्यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. दुसरं कारण म्हणजे राम शिंदे यांच राजकीय पुनर्वसन. राम शिंदे हे 2014 मध्ये कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर आठ जुलै 2022 ला राम शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. त्यानंतर आता यंदाच्या २०२४ विधानसभा निवडणुकीत देखील राम शिंदे यांचा पराभव झाला. म्हणून पुन्हा एकदा राम शिंदे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्यांना सभापतीपद देण्यात आलाय.
यासोबतच राम शिंदे यांना सभापती पद देण्या मागचं सर्वात मोठ कारण म्हणजे धनगर समाजाचा पाठिंबा मिळवणे. राम शिंदे हे धनगर समाजातून येत असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मराठा, ओबीसी, बंजारा, मुस्लिम सारख्या समाजांचे नेते आहेत. त्यामुळे धनगर समाज नाराज होऊ नये यासाठी सोशल इंजीनियरिंग मध्ये एक्सपर्ट असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे निकटवर्तीय राम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लावली आणि या मधून देवेंद्र फडणवीसांनी एका निशाण्यात दोन लक्ष साधल्याचं बोललं जातंय.
“थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर” असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांचं अनोख्या पद्धतीने निवडणूक जिंकल्यानंतर अभिनंदन केलं होतं. तर यावरून राम शिंदे यांनी “अजित पवारांनी महायुती धर्म पाळला नाही” अशी टीका देखील केली होती. त्यामुळे अजित पवारांवर भाजपचे काही समर्थक नाराज होते. पण आता राम शिंदे यांच्या सभापती पदासाठी अजित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलाय, शिवाय ते राम शिंदे अर्ज दाखल करताना स्वतः उपास्थित देखील होते. त्यामुळे त्यांच्यावर असलेली भाजपच्या काही समर्थकांची नाराजी कमी होण्यास मदत होईल.
राम शिंदे यांची सभापती पदी निवड झाल्याने धनगर समाज, स्वतः राम शिंदे, भाजप कार्यकर्ते व देवेंद्र फडणवीस देखील खुश असतील. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी ची यावर कोणतीही हरकत नसल्याने त्यांनी देखील राम शिंदे यांच्या सभापती पदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजपा हे पक्ष तर खुश आहेत. पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज झाल्याच दिसून येतंय. तर सतत च्या मिळणाऱ्याला दुय्यम वागणुकीमुळे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष पुढे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असून यावर तुमचे मत काय? राम शिंदे यांची सभापती पदी केलेली ही नेमणूक योग्य आहे का? पुन्हा एकदा शिंदेंना डावलून भाजपा चूक करतीये का? यावर तुम्हाला काय वाटतं? ते कमेंट करून नक्की सांगा