चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’ काय? रामदास कदम म्हणाले, ‘यांना माहिती नाही की…’

दसरा मेळाव्यानंतर आता धनुष्यबाण चिन्हावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगाकडून अद्याप निकाल हाती आलेला नाही. मात्र निवडणूक आयोगाने पक्षचिन्हच गोठवण्याचा निर्णय घेतला तर काय? यावर शिंदे गटाचा प्लॅन बी तयार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलंय. निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेताना एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी २० लाखांचं मतदान असतं याचाही विचार करेल असे रामदास कदम म्हणालेत.
निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल तसेच एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. मात्र, आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की, धनुष्यबाण निश्चितपणे आम्हाला मिळेल कारण पूर्ण बहुमत आमच्याकडेच आहे असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. पक्षातील बहुमतावर ही कदम यांनी भाष्य केले. तुम्ही जर याआधीचे निवडणूक आयोगाचे निकाल पाहिले तर ज्याच्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, सभापती यांचे बहुमत आहे त्यांच्याच बाजूने निकाल येतो. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क आणि BKC येथेही अधिक ताकद कुणाकडे आहे हे सिद्ध झालंय. लोकशाहीत ज्याच्याकडे अधिक संख्या त्यांना अधिक महत्त्व दिलं जातं असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय.